Sat. Sep 24th, 2022

कर्ज फेडीत महिलाच अधिक प्रामाणिक जिल्हाधिकारी अजय गुल्हाने ; एसबीआय चावडी’ उपक्रमाचे उद्घाटन

यवतमाळ: दि.२८ ‘चूल आणि मूल’ या पांरपरिक संकल्पनेतून महिला कधीच्याच बाहेर पडल्या आहेत. आज कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात महिलांचा वाटा आहे. दैनंदिन व्यवहारातील जमाखर्च, मुलांचे शिक्षण, घरचा ताळेबंद आदी जबाबदा-या त्या समर्थपणे सांभाळत आहेत. कर्ज फेडीत महिला अधिक प्रामाणिक आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.

पोस्टल ग्राऊंड येथे भारतीय स्टेट बँकेच्या क्षेत्रीय व्यवस्थापक कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘एसबीआय चावडी’ उपक्रमाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसबीआयचे उपमहाप्रबंधक रजत बॅनर्जी, अपर पोलिस अधिक्षक नुरूल हसन, क्षेत्रीय व्यवस्थापक सुहास ढोले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक डॉ. रंजन वानखेडे आदी उपस्थित होते.


बँकेच्या वेगवेगळ्या योजना लाभार्थ्यांना कळाव्यात, या उद्देशाने भारतीय स्टेट बँकेच्यावतीने दोन दिवसीय चावडी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, बँकांनी महिला बचत गटांना जास्तीत जास्त मदत करावी. बँकेचे कर्ज महिला वेळेपूर्वीच परतफेड करतात, असा सार्वत्रिक अनुभव आहे. पैशाच्या नियोजनाबाबतीत त्या उत्कृष्ट व्यवस्थापक असून महिलांमुळे गाव, शहर, जिल्हा, राज्य आणि देशाचा विकास होण्यास मदत होते. महिला बचत गटाची चळवळ आणखी जोमाने चालविण्यासाठी भारतीय स्टेट बँकेने बचत गटांना सहकार्य व आर्थिक मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. या चावडी उपक्रमाच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ व ग्राहक मिळावे, हासुध्दा उद्देश आहे, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.


तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी बचत गटाच्या महिलांना कर्जाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रदर्शनात एकूण 45 स्टॉल लावण्यात आले असून यापैकी 32 स्टॉल महिला बचत गटांचे आहे. यात मादणी येथील सावित्रीबाई फुले महिला बचत गट, आर्णि येथील अनुसया माता महिला बचत गट, कांडली येथील जगदंबा महिला बचत गट, उचेगाव येथील दुर्गा शक्ती महिला बचत गट, वटफळी येथील वैष्णवी महिला बचत गट आदींचा सहभाग आहे.
कार्यक्रमाला जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजयकुमार भगत, सुजित क्षिरसागर यांच्यासह भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *